रांगोळी


                          रांगोळी

                  



          माझे हे टुमदार अंगण बाई

     पाणी शेणाने सारवल सकाळी

त्यावर उठुन दिसे मांगल्याची

     शुभ्र स्फटिक अशी रांगोळी...       

"रांगोळी" हा शब्द ऐकला किंवा उच्चारला तरी मांगल्य, चैतन्य, पावित्र्य अन समाधान आपल्या पुढे उभं रहात..घरापुढे अंगणात रोज रांगोळी काढली जाते. तसेच  प्रत्येक सणावारास  पांढरी शुभ्र अन त्यावर अनेक वेगवेगळे रंगछटांनी निर्माण झालेली रांगोळी तर साक्षात 'सरस्वती' चे रुपच दिसते...पांढरे शुभ्र वस्र लेवलेली सरस्वती जणु भरजरी रंगीबेरंगी रत्नांनी, अलंकारांनी शोभली आहे असे दिसते...आपल्या भारतीय संस्कृतीत तर रांगोळीचे फार महत्त्व आहे...मला रांगोळी म्हटलं कि माझी आई आठवते. 

     माझ्या माहेरी आई पहाटेच ४ किंवा ४.३० ला उठायची तस  अजुनही तीची उठायची वेळ चुकली नाही...सकाळी लवकरच दिवसाची दिनचर्या तिची सुरु आसायची. तिचे स्वतःचे आवरुन झाल्यावर घराच्या सर्व खोल्या साक्षात लक्ष्मीच रुप असलेल्या झाडणीने झाडून स्वच्छ करायची..त्यानंतर आमच्या घरासमोर असलेल्या टुमदार अंगणाला झाडणीने स्वच्छ करुन पाण्याचा सडा करायची..दाराच्या उंबर्यात गोपद्म, लक्ष्मी ची सुंदर पाऊलं काढायची..दाराच्या एका बाजुला श्रीराम लिहायची...त्यावर हळदी कुंकू, अक्षदा वाहुन नंतर अंगणात रांगोळी काढायची... हाताच्या दोन बोटांच्या चीमटीतुन रांगोळीचे वेगवेगळे सुंदर आकार, तर कधी ढिंपक्यांची, तर कधी पाना फुलांची अशी सुंदर रांगोळी काढायची. सणवार आले कि अजुन रांगोळीचे महत्त्व वाढायचे..दिवाळी, दसरा, गौरी गणपती, संक्रांत अश्या सणांना आम्ही सर्वच बायका, मुली रांगोळी काढायच्या लगबगीत असायचो...सकाळी वेगळी संध्याकाळी वेगळी अस ठरवायचो..आणि मग संध्याकाळी   पूर्ण अंगण भरेल अशी मोठी संस्कारभारतीची रांगोळी काढली जायची तर कधी गालिचा काढला जायचा...नवरात्रांत तर कृष्ण आणि राधा यांची रासक्रिडा रांगोळी मधून दिसायची...रांगोळीत उतरलेल्या वेगवेगळ्या छटा पाहण्यास सार्यांची गर्दी जमायची...रांगोळी तस साधी असली काय किंवा रंगांनी भरलेली असली काय तरी पण रांगोळी खूप काही बोलुन जाते...

   दारापुढची रांगोळी म्हणजे मांगल्य, अन उत्साह असतोच...

कोणतीही व्यक्ती जेव्हा घरात येणार असते..तेव्हा ती व्यक्ती कशी आहे आपल्याला माहित नसत..जर एखादा नकारात्मक विचार करुन ती व्यक्ती आली तर रांगोळी पाहुन तीचा नकारात्मक विचार सकारात्मकतेकडे वळतो...रांगोळी चा विशेष गुण म्हणजे प्रसन्नता...रांगोळी पाहिल्या बरोबर कुस्चित भावना असलेली व्यक्ती सुध्दा रांगोळी पाहुन प्रसन्न होते...देवाचं जिथे वास्तव्य तिथे रांगोळीचे स्थान असते...मंदिरापुढे काढलेली रांगोळी जेवढी पवित्र मानली जाते तेवढी घराच्या दारापुढे काढलेली रांगोळी ही पवित्र मानली जाते...ज्या घरापुढे रांगोळी असते तिथे ईश्वरी वास असतो. घर मंदिरा एवढे पवित्र करायच काम हे रांगोळीच करते...घरात असलेल्या देवघरात सुध्दा प्रत्येक दिवशीची वेगवेगळी रांगोळी काढुन देवांची प्रतिक रांगोळीतुन साकारुन, कधी कमळ, स्वस्तिक, फुल, गोपद्म, लक्ष्मीची पाऊले अश्या रांगोळी काढुन घरातील देवालय सुशोभित केल जात...

      रांगोळी चे संस्कार माझ्यात माझ्या आई मुळेच रुजले आहेत. प्रत्येक माणसाचे रांगोळीशी प्रेमाचे नाते असते जास्त करुन माहिला वर्ग म्हणजे रांगोळी काढण्यात तरबेजच असतो... पुरुष देखील रांगोळी काढण्यात मागे हटत नाही. मला आठवतय की मी लहान असतांना आमच्या गल्लीत रहाणारे 'छोटु काका' उभ्या उभ्या पटकन पाच बोटांची रांगोळी काढायचे...छान रेखीव रांगोळी काढायचे ते...गल्लीत दिवाळी मध्ये रांगोळी स्पर्धा व्हायच्या तेव्हा एकसारखे चौकोन आखले जायचे छान गेरु ने ते चौकोन रंगवुन सगळे स्पर्धक रांगोळी काढायला सज्ज व्हायचे सगळ्यांच्याच कल्पना शक्ती ला जणू उधान यायचे, अन् वेगवेगळ्या कल्पनेने काढलेल्या रांगोळ्यांनी संपूर्ण गल्ली सुशोभित व्हायची..आणि प्रत्येक वर्षी रांगोळीतला पहिला ते उत्तेजनार्थ मध्ये आमच्या घराचा नंबर यायचाच. आमच्या काकी आणि ताई ह्या सुंदर रांगोळी काढायच्या..माझ्या लग्नानंतरही अश्या रांगोळी स्पर्धा मी आमच्या शाळेत पाहिल्या..ज्या शाळेत मी शिक्षिका आहे तिथे ह्या स्पर्धा गणपती बसल्याच्या दुसर्या दिवशी आयोजित होतात...प्रत्येक गटाच्या विद्यार्थ्यांला चौकोन आखून दिलेले असतात फक्त मुलींच नाही तर मुलही सहभागी होतात...रांगोळी अन् रांगोळीचे रंग जरी सारखेअसले तरी त्या रांगोळी ने त्या दिवशी विविध रुप घेतलेली आढळुन येतात...प्रत्येक वर्गात काढलेल्या रांगोळ्यांनी डोळे दिपुन जातात...कारगील, गणपती, भाऊ बहिण, बेटी बचाओ, वृक्षसंवर्धन, पर्यावरण, असे अनेक विषय ह्या रांगोळीतुनच बोलत असतात...किती छान आपल्या कल्पनाशक्ती वापरुन हि रांगोळी काढली जाते...तसेच शाळेतील सर्व कार्यक्रमात आमच्या शाळेतील शिक्षिका रांगोळीतुन आपला कलाविष्कार सादर करतात. खरच रांगोळी बद्दल बोलावे तेवढे कमीच आहे लहान पणापासुन ह्या रांगोळीशी आपण जोडले जातो...खरच संस्काराचे बीज ही रांगोळी आपल्यात पेरतांना दिसत असते...  आयुष्याच जगणे रांगोळी देऊन जाते. रांगोळीचे आयुष्य हे क्षणभंगुर असते. वारा, पाऊस किंवा कधी लहान मुलांकडून तीचे रुप पटकन नष्ट होते.पण पुन्हा तीचे  ताजेतवाने रुप दुसर्यादिवशी आपल्याला खुललेले दिसते. माहित असते तीलाही कि पुसली जाणार आहे कधी ना कधी ती...मग म्हणुन काही ती तिच सौदर्य खुलवायचे सोडत नाही...पुन्हा नव्याने सजते कधी रंगाने, तर कधी पाना फुलांनी, कधी वृक्ष वेलींच्या विविध रुपांनी नटत असते ती....

     जगणे खरे प्रत्येक माणसाने

      रांगोळीकडून शिकावे...

     आयुष्यांच्या प्रत्येक वळणावर                        

     आनंदाने स्वार व्हावे....   

 पावित्र्य, मांगल्य, सौंदर्य, संस्कार, औदार्य, हे सार काही रांगोळीत असत म्हणून तीला पाहुन आपल्यात रांगोळीच बीज रुजतं...आईची चांगली वागणुक पाहुन मुल ही तीचे अनुकरण करुन चांगलीच घडत असतात तसेच पहाटेच सडा रांगोळी करणार्या आईला तिची लेक मोठ्या कौतुकाने पहात असते अन् तिचे लग्न झाल्यावर ती तेच अनुकरण करत असते...म्हणजे पहा ना हे रांगोळीचे उत्तम संस्कार किती पिढ्यानपिढ्या चालु असतील...  

       रांगोळी हा छोटा शब्द 

       संस्कार मनात रुजवतो

       रांगोळीचा रंग पहा 

       माझ्याही अंगणी खुलतो...

       चिमुटभर रांगोळी ही 

       अनेक आकाराने सजते

       रंग रुप ना सारखे तरीही

       नव्या छटे भोवती रंगते

       प्रत्येकानेच आपल्या

       दारात रांगोळी काढावी

       मांगल्याची दारं ही पवित्र

       रांगोळीने च सजवावी...       

       

    

     ...चैताली विभुते...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुखाची निंद

आदरणीय पप्पा(बाबा)